पंचकर्म – आयुर्वेदातील शरिरशुद्धीकरण

!! श्रीः !!

आयुर्वेद हे भारतीय प्राचीन वैद्यकीय शास्त्र असुन आजमितीला सर्व जगभर आयुर्वेदाची चिकित्सा करुन घेण्यासाठी लोक आसुसलेले आढळतात. पण दुर्दैवाने भारतीय समाजाची मानसिकता मात्र अजुनही आयुर्वेदाकडे “आजीबाईचा बटवा किंवा स्वयंपाकघरातील आयुर्वेद” या संकल्पनेच्या पुढे जाताना दिसत नाही. आयुर्वेद हे शास्त्र निसर्गपुजक किंवा निसर्ग संलग्न असे शास्त्र आहे. “पिंडी ते ब्रम्हांडी “या मुलभुत तत्वानुसार जे जे निसर्गात आहे ते ते या देहात आहे आणि म्हणुन निसर्गातील घटकांचा,वस्तुंचा ,वनस्पतींचा वापर केल्यास त्यापासुन कमीत कमी हानी होऊन जास्तीत जास्त शरिर घटकांमध्ये नैसर्गिक रुपांतर होण्याची प्रक्रिया ही दिसुन येते. म्हणुन पर्यायाने आयुर्वेदिय चिकित्सा ही नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करुन केली जाते. याच पद्धतीने विचार करत असताना रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार तर जरुरी आहेतच पण रोग होउच नयेत म्हणुन आयुर्वेदामध्ये काही उपचार नक्किच सांगितलेले आहेत.

आजकाल आपण पाहतो की एलोपॅथिक शास्त्रामध्ये विविध आजारांची लागण शरिराला होऊच नये म्हनुन विविध प्रकारचे लहान मुलांपासुन वयस्कर लोकांमध्ये “लसीकरण”करण केले जाते. त्यामध्ये हिपॅटायटीस बी, रेबिज, धनुर्वात ,रोटाव्हायरस लस इ. अनेक लसीकरण केले जाते.”Prevention is better than cure” हे तत्व आयुर्वेदामध्ये फार पुर्वीच सांगितलेले आहे. ”स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं व्याधितस्य व्याधिपरिमोक्षणं च !!” हेच आयुर्वेदाचे प्रथम सुत्र आहे. या तत्वाला अनुसरुनच आयुर्वेदामध्ये स्वस्थवृत्त म्हणजेच माणसाची दिनचर्या कशी असावी ? ऋतुचर्या कशी असावी? कोणाची काय प्रकृती असते? कोणत्या प्रकृतिच्या व्यक्तीने कसे राहीले पाहीजे? काय खाल्ले पाहीजे ? काय टाळले पाहीजे?गोड कोणाला मानवते ? तिखट ,खारट,कडु कोणी खावे? आंबट कोणी खाउ नये? या बाबींचा तपशीलवार विचार केलेला आहे. तसेच चुकिच्या आहार विहारादी जीवनशैलीमुळे शरिरात विषारे / आम  निर्माण होऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन विविध आजार उत्पन्न होतात. अशा वेळी औषधी उपचार करुनही तात्पुरताच उपयोग झाल्याचे आढळते. आयुर्वेदात मात्र या अश्या वाढलेल्या विषारांना शरिराबाहेर काढुन टाकण्यासाठी वात ,पित्त ,कफ या नैसर्गिक प्रकृतिंनुसार पाच प्रकारची कर्मे (  Detoxification Procedures ) सांगितलेली आहेत. या पाच प्रकारच्या प्रक्रियांनाच पंचकर्म असे म्हणतात.

यामध्ये “वमन “ ही प्रक्रिया  शरिरातील विकृत कफ स्वरुपात वाढलेल्या विषारांना  शास्त्रशुद्ध पद्धतीने उलटीवाटे बाहेर काढुन करवली जाते. यामध्ये सोरीयासिस, दमा ,विविध त्वचाविकार,अम्लपित्त, मधुमेह, पाळिच्या तक्रारी ,आमवात (सांध्यांना सुज येणे, सांधे वाकडे होणे) ,किडनीचे विकार (मुत्रपिंडाला सुज येणे) शितपित्त( अंगावर पित्ताच्या गांधी उठणे),अमर्याद वजन वाढणे ,स्त्रियांमधील वंध्यत्व, मानेच्या वरच्या भागातील विविध आजार ,नाकाचे हाड वाढणे ,सतत सर्दि ,शिंका येणे, यासारख्या अनेक आजारांचे विकृत कफ हे कारण असल्याने “वमन” या पंचकर्माद्वारे शरिराचे शुद्धिकरण करुन नंतर औषधोपचार केल्यास आजार कायम स्वरुपी बरा होऊ शकतो. तसेच आजार होऊच नयेत म्हणुनही वसंत ॠतुमध्ये म्हणजेच थंडी संपल्यावर चैत्राच्या आसपास ( मार्च /एप्रिल या महीन्यात) आपापल्या प्रकृतिला अनुसरून वर्षातुन एकदा “ वमन “ करुन घेतल्यास पुढे होणारे अनेक आजार टाळता येऊ शकतात.

यापुढील शरिर शोधन प्रक्रीया म्हणजेच “विरेचन”. यामध्ये विकृत पित्त स्वरुपात वाढलेल्या विषारांना  शास्त्रशुद्ध पद्धतीने जुलाबावाटे बाहेर काढुन करवली जाते. विविध प्रकारचे ऊष्णतेचे विकार , ह्रदयाचे विकार, पॅरॅलिसिस , त्वचेचे विकार, पोटाचे विकार , अजीर्ण ,मलावष्टंभ ( पोट साफ न होणे) ,पोट दुखी, विविध प्रकारच्या गाठी , डोळ्यांचे विविध आजार , आतड्यांना सुज ,काविळ , पचन संस्थेचे विविध विकार , संपुर्ण शरीरावर सुज , नाकातुन  घशातुन रक्त पडणे , श्वसनाचे विकार , बी.पी. वाढणे , मानसिक आजार , वारंवार डोके दुखणे , पित्ताशयात खडे होणे , यकृताचे विविध आजार  यांसारख्या अनेक आजारांवर “विरेचन” हे पंचकर्म उपयोगी पडते. याशिवाय हे आजार होऊच नयेत म्हणुनही  प्रामुख्याने शरदॠतुमध्ये व हेमंत ॠतुमध्ये ( नोव्हेंबर/डिसेंबर/जानेवारी/फेब्रुवारी) ही विरेचन प्रक्रीया केली जाते. अनेक रुग्ण किंवा स्वस्थ व्यक्ती दरवर्षी नित्यनियमाने हे विरेचन कर्म करवुन घेतात कारण त्यांनी याचे फायदे मागील वर्षी अनुभवलेले असतात.

यापुढील शरिरशोधन प्रक्रिया म्हणजे “बस्ति”. हे पंचकर्म प्रामुख्याने “विकृत वात” यासाठी केले जाते. आयुर्वेदामध्ये “बस्ति” हे कर्म सर्व प्रकारच्या आजारांची “अर्धी चिकित्सा”म्हणुन सांगितलेली आहे. “वात”या शरिरातील घटकाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शरिरातील कोणत्याही घडामोडी या वाताशिवाय होऊच शकत नाहीत असे सुत्र सांगते. त्यामुळे आजार कोणताही असु दे तो होण्यामागे बिघडलेला वात हे कारण प्रामुख्याने असु शकते. अश्या सर्व प्रकारच्या वाताच्या विकारांमध्ये ,सांध्याचे विकार, मणक्यांचे विकार , Ankolysing spondilytis ,Lumber spondylosis ,cervical spondylosis, Muscular Spasm , गर्भाशयजन्य दोष, स्त्रीयांमधील रजोदोष मलावष्टंभ , आतड्यांचे विविध विकार , इ. अनेक विकारांवर विविध औषधांच्या काढ्यांचा , औषधी सिद्ध दुधाचा ,औषधी तेलांचा ,तुपांचा बस्ति हा गुदद्वारामार्गे शरिरात सोडला जातो .ज्यामुळे पक्वाशयामध्ये हि औषधे जाउन रक्तवाहिन्यांमार्फत शोषली जाऊन  वरिल विकारांवरअपेक्षित कार्य घडवुन आणले जाते. हे बस्ति कर्म प्रामुख्याने स्वस्थ व्यक्तीकरिता पावसाळ्यामध्ये केले जाते.

पुढील पंचकर्म म्हणजेच “नस्य” नाकाद्वारे औषधी तेले,तुपे, दुध ,चुर्ण शरिरामध्ये सोडुन आजारांना कारणीभुत अशा विषारांना शरिराबाहेर काढुन टाकणे किंवा त्या दोषांचे शमन करणे या प्रक्रियेला नस्य म्हणतात. ”नासा हि शिरसो द्वारम्…!!” असे आयुर्वेदामध्ये एक सुत्र आहे…शिरोस्थानामध्ये पोहोचण्याचा मार्ग नाकामधुन जातो.त्यामुळे मेंदुचे विविध विकार, चेह-याचे त्वचेचे विकार, जुनाट सर्दी ,नाकाचे हाड सतत वाढणे , नाकामध्ये मांसांकुर निर्माण होणे,मानसिक विकार , फिट्स येणे, स्त्रियांमधील Hormonal Imbalance , Facial Paralysis, कानाचे जीर्ण विकार ,डोळ्यांचे विविध आजार यासारख्या अनेक तक्रारीसाठी नस्य हे पंचकर्म केले जाते.

पंचकर्मापैकी शेवटचा म्हणजेच पाचवा उपक्रम म्हणजे “रक्तमोक्षण”. याचा अर्थ शरिरातील अशुद्ध रक्ताचे निर्हरण करणे. “रक्तं जीव इति स्थिति..!! “असे एक आयुर्वेदातील सुत्र आहे. रक्त धातु म्हणजेच जीव आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितित त्याचे रक्षण केले पाहीजे. त्यामूळे विविध कारणांनी रक्तामधील दोष वाढले असता सोरीयासिस, त्वचेचे विकार, सुज येणे , सांधे सुजणे, लाल होणे ,दुखणे ,गाठी तयार होणे , फोड येणे ते पिकणे, गळु किंवा बेंड उठणे ,पित्ताच्या गांधी उठणे , केसांमध्ये चाई पडणे ( केस जाणे) , त्वचेवर डाग पडणे ,पायाचे अंगठे सुजणे , Gout , Vericose veins , यांसारखे आजार निर्माण होतात .यामुळे रुग्ण पुरता बेहाल होऊन जातो. यामध्ये कोणतेही उपचार घेतले असता तात्पुरता उपयोग होतो. अशा वेळी औषधी उपचारांबरोबरच “रक्तमोक्षणाद्वारे” अशुद्ध रक्त शरिराबाहेर काढुन टाकले असता आजार पुर्ण व लवकर बरा होण्यास मदत होते. प्रायः शरद ॠतुमध्ये  विधिपुर्वक सार्वदेहीक रक्तमोक्षण केल्यास  शरिर स्वस्थ राहुन सर्व येणा-या रोगांपासुन शरिर संरक्षित ठेवता येऊ शकते.

वरिल पाचही प्रकारची कर्मे ही एखाद्या आजाराची शोधन चिकित्सा म्हणुन तसेच  शरिरात रोग निर्माण होऊच नयेत म्हणुन करुन घेणे श्रेयस्कर ठरते. वर्षातुन एकदा आपापल्या प्रकृतिनुसार कोणते कर्म आपणास गरजेचे आहे याचा तपास जवळच्या वैद्याकडे जाउन करुन घेतल्यास शरिरामध्ये रोगप्रतिकार शक्ती ,पचन व्यवस्था , यकृत ,मुत्रपिंड ,प्लिहा ,श्वसन संस्था इ सुस्थितित राहुन  मानसिक स्वास्थ्य लाभल्याचा आनंद प्रत्येकजण घेऊ शकतो.

भारताबाहेरिल अनेक रुग्ण केवळ या पंचकर्म उपचारांचे महत्व ओळखुन तसेच “जागतिक आरोग्य संघटनेने “ या पंचकर्म उपचारांना मान्यता देऊन त्याचा प्रचार व प्रसार केल्याने खास Medical Tourism च्या नावाखाली भारतात येऊन विविध आयुर्वेदिक क्लिनिक्स वा हॉस्पिटल्स मध्ये जाऊन लाखो रुपये खर्चुन उपचार घेऊन स्वस्थ होऊन जातात. आपण भारतीय मात्र आयुर्वेद म्हणजे असंशोधनात्मक आहे किंवा उशिरा गुण येतो या भ्रमापायी आपल्या या जगन्मान्य शास्त्राकडे कानाडोळा करतो व पर्यायाने स्वतःचेच नुकसान करुन घेतो आहोत. यापुढिल काळात या आपल्या प्राचीन वैद्यकिय शास्त्रामध्ये विश्वास व्यक्त करुन संशोधनात्मक विचार ठेउनच चिकित्सा करुन घेतल्यास “सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः !!” हे जे वेदसुत्र आहे ते साध्य करुन घ्यावे या अपेक्षांसह लेखन मर्यादा पाळतो.धन्यवाद.

वैद्य. नितिन थोरात MD(Ayu) ©

Mob.9867980769

www.suvarnarasayan.com